दूधात पाणी मिसळलं अन्...
दुधात पाणी मिसळलं अन् नियतीनं डाव साधला. मुलाला दूध द्यायचं होतं. दूध जास्त घट्ट होतं म्हणून त्यांनी त्यामध्ये पाणी मिसळलं आणि मुलाला दिलं. मात्र त्यानंतर मुलाची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
६ महिन्यांच्या काळजाच्या तुकड्याने अखेर आपला प्राण सोडला आणि आईनंही टाहो फोडला. आईला वाटलं बाळाची भूक भागेल, तिच्या एका चुकीची किंमत तिला मोजावी लागली. ते पाणी पाणी राहिलं नव्हतं तर विष झालं होतं. ते पाणी पिताच बाळाला उलट्या सुरू झाल्या आणि बघता बघता त्या चिमुरड्यानं आईच्या कुशीतच प्राण सोडले.
advertisement
इंदूरमध्ये 8 लोकांचा बळी
इंदूरच्या भागीरथपुरा परिसरातील दूषित पाण्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली आहे. तर यामुळे 8 जणांचा जीव गेल्याची माहिती मिळाली आहे. लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यानंतर तपास करण्यात आला. तपासात समोर आलं की, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये चक्क ड्रेनेजचं सांडपाणी मिसळत होतं.
ज्या आईने १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपलं बाळ गमावलं तिच्यासाठी हे दु:ख खूप मोठं आहे जे पैशांच्या मदतीनं कधीही भरुन निघणार नाही. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हे बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
१४९ लोकांना सुरू झाल्या उल्ट्या
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १४९ रुग्णांना उलट्या-जुलाब आणि पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भागीरथपुरा परिसरातील मराठी मोहल्ल्यात गेल्या अनेक दिवसांपासून घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज पीडित कुटुंबांची भेट घेणार आहेत.
स्वच्छतेच्या पुरस्कारांचे मानकरी ठरणाऱ्या शहरात पिण्याच्या पाण्यामुळे लोकांचा जीव जाणे, हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा मानला जात आहे. ज्या शहराच्या स्वच्छतेचा अभिमान देशाला वाटतो, तिथेच मूलभूत गरजांसाठी लोकांना जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
