Sunetra Pawar: 'मी दु:ख बाजूला ठेवलं कारण...' सुनेत्रा पवारांचं पहिलं भावनिक पण तितकंच कणखर भाषण, भाषणातला शब्द न् शब्द
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांनी नेते, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केले.
advertisement
1/11

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते, छगन भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, पदाधिकारी आणि देशातील विविध राज्यांतील नेते आणि येथे उपस्थित असलेले सर्व निष्ठावंत पक्ष कार्यकर्ते, बंधू-भगिनी आणि पत्रकार मित्रांनो... हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या मान्यवरांना मी अभिवादन करते.
advertisement
2/11
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्यासाठी हे केवळ एक पद नाही तर लाखो कार्यकर्त्यांच्या आशा, कल्पना आणि संघर्षांची जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करण्याची एक उत्तम संधी आहे. तुमचा विश्वास ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. मी तुम्हाला खात्री देते की पक्षाची विचारधारा, जनसेवेची परंपरा आणि संघटनात्मक ताकद आणखी मजबूत करण्यासाठी मी पूर्ण निष्ठा आणि समर्पणाने काम करेन.
advertisement
3/11
आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांच्या जाण्याने झालेल्या दुःखातून आपण सर्व अजूनही सावरलेलो नाही. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन येणं शक्य नाही, याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे.... अजितदादा. ते आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकरी, युवक, महिला आणि आपल्या पक्षासाठी झटत राहिले.
advertisement
4/11
दादा आज आपल्यात नाहीत, हा आघात प्रचंड मोठा आहे. मात्र यातून आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे... आपल्याला आता सावरलं पाहिजे... कारण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक पक्ष नाही, तर तो एक विचार आहे, एक परिवार आहे. महाराष्ट्राच्या समृध्दीचा, देशाच्या परिवर्तनाचा, महत्वाचं म्हणजे तुमच्या-आमच्या सर्वांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा पक्ष आहे. हा विचार पुढे नेण्यासाठी, या कठीण काळातही आपल्याला निर्धारानं पुढं जावं लागेल. आदरणीय दादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही... हे सत्य आहे. पण त्यांनी दिलेला विचार, त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला कार्यकर्ता... हीच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद आहे.
advertisement
5/11
३० जून २०२३ रोजी आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आदरणीय दादांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा साधारणपणे अडीच वर्षाचा कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षाचा विस्तार केला. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं. कष्ट, समर्पण आणि काटेकोर नियोजनाने पक्षाची ताकद वाढवली... दादांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कालावधीत लोकसभा, महाराष्ट्र विधानसभा, (अरुणाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मिर, बिहार राज्यातल्या विधानसभा) महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. या कालावधीत अनेक संकटं, तांत्रिक अडचणी असतानासुध्दा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दमदार कामगिरी केली आहे. या अडीच वर्षाच्या अल्पावधीतसुध्दा त्यांनी आपलं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर सिध्द केलं. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, देशाच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारा, जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. देशाची निर्मिती संघर्षातून झाली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झाला आणि संघर्ष करतंच मोठा झाला.
advertisement
6/11
तब्बल २७ वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करत आपला पक्ष आज तारुण्यात आहे. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे, उत्साह आहे. या उत्साहाला योग्य दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मी सुध्दा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण माझ्यासाठी नवं नाही. आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी चाळीस वर्षे संसार केला आहे. त्यामुळं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कठीण असली, तरी तुमच्या सर्वांच्या साथीनं ती अजिबात अशक्य नाही. याचा मला विश्वास आहे. हा अध्यक्षपदाचा सन्मान केवळ माझा नसून, तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, माता-भगिनींचा सन्मान आहे, असं मी मानते.
advertisement
7/11
आदरणीय दादांनी आयुष्यभर 'शिव-शाहू-फुले-आंबेडकर' यांचा विचार जपला... या विचारांत कधीही तडजोड केली नाही. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. तोच वारसा, तोच विचार आपल्याला पुढं न्यायचा आहे. समाजातल्या कोणत्याही घटकाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आज मी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असले तरी, खरं तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्षच आहे... याच भावनेतून आपण सर्वांनी काम करायचं आहे.
advertisement
8/11
आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. ग्रामीण भागात आपल्या पक्षाची मुळे घट्ट आहेत... आता शहरी भागातही आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे... तिथंसुध्दा आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे. पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन, त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं काम आपण करणार आहे. कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, क्रीडा, युवक आणि महिला सक्षमीकरण या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आघाडी घ्यायची आहे. या क्षेत्रात काम करायचं आहे
advertisement
9/11
आज महिलांची लोकसंख्या 50 टक्क्यांच्या आसपास आहे. महिला या देशाच्या विकासाचं इंजिन आहेत. या प्रवासात कोणीही मागे राहू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. लाडकी बहिण योजना आपण आणली आहे. म्हणून आपली जबाबदारी इथंच संपत नाही. महिला सक्षमीकरण, आर्थिक सबलीकरण आणि प्रशासनात त्यांचा सहभाग वाढावा यासाठी आपल्याला पक्ष म्हणून विशेष काम करावं लागणार आहे. शेतकरी हा आपला महत्वाचा घटक आहे. शेती अधिक किफायतशीर आणि फायदेशीर कशी होईल, यासाठी आदरणीय दादांनी एआय तंत्रज्ञानावर सातत्यानं भर दिला होता. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं, त्यांना तंत्रज्ञानाची जोडधंद्याची जोड देणं यासाठीही दादांनी विशेष प्रयत्न केले.
advertisement
10/11
दादांच्या जाण्याने... आपल्या सर्वांच्यावर येणारी प्रत्येक संकटं स्वतःच्या अंगावर झेलणारा... सह्याद्री आता आपल्यात राहिला नाही. पण त्या सह्याद्रीने दिलेला विचार, शिकवण, ती जिद्द आपल्याला पुढं न्यायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारत असताना... आज माझ्या डोळ्यासमोर स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महाराणी ताराराणी आणि माझ्या आजेसासू शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा माझ्यासोबत आहे. आदर्श आहे. या आदर्शाच्या कार्य-कर्तृत्वाकडे बघत मी ही जबाबदारी स्वीकारत आहे.
advertisement
11/11
माझं वैयक्तिक दुःख मी बाजूला ठेवलं आहे. कारण महाराष्ट्राचं कल्याण, जनतेचं भलं आणि राष्ट्रवादीचा विचार... हेच आता माझं ध्येय आहे. केवळ पार्थ... आणि जय... हेच माझं कुटुंब नाही... तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार आहे... दादांनी या पक्षाला ज्या आत्मियतेनं, ज्या जिव्हाळयानं आणि ज्या पध्दतीनं एक कुटुंब म्हणून जपलं, त्याच पध्दतीनं, काकणभरही कमी न पडू देता, मी या पक्षाला-म्हणजेच आपल्या या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शब्द देते की... "उतणार नाही... मातणार नाही... घेतला वसा टाकणार नाही... आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न करूया.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: 'मी दु:ख बाजूला ठेवलं कारण...' सुनेत्रा पवारांचं पहिलं भावनिक पण तितकंच कणखर भाषण, भाषणातला शब्द न् शब्द