पुणे: गेल्या काही वर्षांपासून वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे आणि मृत्यूचे देखील प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा इशारा हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन यांनी प्रसिद्ध केलेल्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025 या अहवालात देण्यात आला आहे. या अहवालानुसार, 2023 साली देशात सुमारे 20 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे झाला. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचा देखील अहवाल समोर आला आहे.
advertisement
यात हवेचा गुणवत्ता निदर्शनांक 100 पुढे गेला आहे. यामुळे वायू प्रदूषणामुळे होणारे आजार टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत डॉ. अशोक बनसोडे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे. डॉ. अशोक बनसोडे यांनी सांगितले की दमा हा जुना आजार असला तरी त्याचे प्रमाण आता झपाट्याने वाढत आहे. यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. वेगाने होणारे आधुनिकीकरण, बदलती जीवनशैली आणि अशा विविध कारणांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
तसेच अनेक लोकांना दमा झाला असतानाही ते हा आजार लपवून ठेवतात. दमाची पातळी वाढल्यानंतरच ते डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे कोणतीही लक्षणे जाणवताच तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रदूषण जास्त असलेल्या भागात जाणे शक्यतो टाळावे. जावेच लागले तर मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. घरात अगरबत्ती किंवा धुपाचा अतिरेक टाळावा,तसेच श्वासाचे व्यायाम करण्याचा आणि लसीकरणाचा देखील सल्ला त्यांनी दिला आहे.