घड्याळाचे ठोके चुकले की काय?
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रभाग क्रमांक 25 मधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचं कार्यकर्त्यांना समजलं. तेव्हा सर्वांनी तोंडा बोटं घातली. घड्याळाचे ठोके चुकले की काय? असा सवाल विचारला जात होता. सोशल मीडियावर काही वेळ चर्चा सुरू झाली. पण प्रकरण समोर आलं तेव्हा सर्वांना धक्काच बसला.
advertisement
अजित पोपट पवार
पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधून अजित पोपट पवार या स्थानिक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे अजित पोपट पवार हे देखील राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. अजितदादांनी त्याला तिकीट देऊ केलंय का? असा सवाल विचारला जातोय. तरी अद्याप त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही. ‘ड’ या जागेसाठी अर्ज भरला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चर्चा आणखी रंगली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
दरम्यान, काही जणांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारच महापालिकेची निवडणूक लढवत असल्याचा अंदाज बांधला. मात्र, प्रत्यक्षात हे नावाचं साधर्म्य असून उमेदवार वेगळा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कसं चित्र पहायला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
