पुणे महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला उमेदवारी दिल्याचं उघड झालं आहे. आंदेकर कुटुंबातून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. ही घटना ताजी असतानाच आता अजित पवारांकडून मोक्काचा गुन्हेगार बापू नायरला उमेदवारी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. आंदेकर , मारणेंपाठोपाठ बापू नायरला ही उमेदवारी दिल्याने अजित पवार गुन्हेगारीला पाठबळ देत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
कोण आहे बापू नायर?
बापू नायर याचं पूर्ण नाव कुमार प्रभाकर नायर असं आहे. बापू नायर हा पुणे शहरातला एक कुख्यात गुंड आणि टोळीप्रमुख आहे. त्याच्यावर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' म्हणजेच मोक्का (MCOCA) अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहे. बापू नायरवर पुणे आणि परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याचा कट रचणे आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे असे १५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच पुण्याच्या धनकवडी आणि अप्पर इंदिरानगर भागात त्यांची स्वतःची गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे.
युवा सेनेचा पदाधिकारी दीपक मारटकर खुनाचा कट
२०२० मध्ये पुण्यात युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या झालेल्या हत्येचा कट बापू नायरनेच कारागृहात असताना रचल्याचा होता. हे नंतर पोलीस तपासात समोर आलं होतं. बापू नायरला २०१६ मध्ये दिल्लीतून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा जेलमघ्ये आहे. त्याच्यावर अनेकदा मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. एवढंच नाहीतर पुरंदर तालुक्यामध्ये बापू नायरने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचा आरोपही आहे. या प्रकरणात त्याच्या आईलाही अटक करण्यात आली होती.
