अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?
काल वाडीया कॉलेजमध्ये जो राडा झाला, त्यानंतर मी आज आयुक्तांना भेटायला गेलो. असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. ते जरी सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत आहे. तुम्ही बोट लावलं तर आम्ही हात लावणार, तुमच्या ॲक्शनला रिअॅक्शन मिळणारच, अशा थेट धमकीवजा इशारा अमित ठाकरेंनी ABVPला दिला.
advertisement
मला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. मी एवढंच सांगतोय की, कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. काल एका ऑफिसला टाळे ठोकले आहे. जे पोस्टर लावलेला आहे. त्यावर मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. सीसीटीव्ही फुटेज आहेत. पोस्टर लावणारे जर एबीव्हीपीचे कार्यकर्ते निघाले तर त्यांचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील. ती मुलं कोण आहेत? ते बघून यापुढे आमची अशीच रिअॅक्शन मिळणार असंही अमित ठाकरे म्हणाले.
नेमका वाद काय झाला?
सोमवारी पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. पण या कार्यक्रमाच्या ठिकाणीच आखिल भारतीय विद्यार्थी सेना अर्थात एबीव्हीपी पोस्टर लावल्याने दोन्ही संघटनांमध्ये वाद उफाळला आहे. संबंधित पोस्टरमध्ये ABVP ने इतर संघटनांना दुय्यम लेखून वाडिया कॉलेजमध्ये केवळ आपल्याच संघटनेचं वर्चस्व असेल, असा मजकूर लिहिला होता. यावरून दोन्ही संघटनांमध्ये वाद उफाळला. याप्रकरणी मनसेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील ABVPच्या मुख्य शाखेला टाळं ठोकलं.
