काय म्हणाली विक्रमची आई?
दोघांचं सहा वर्षांचं रिलेशनशीप होतं. माझ्या पोरानं लग्न करायचं म्हणून आठ ते दहा तोळं नेऊन दिलं. तिच्या बापानं धमक्या देत माझ्या पोराला मारलं. तिच्या बापानं तिच्या पोरीला पण मारलं. तुझ्यावर बलात्काराची केस टाकील म्हणून माझ्या मुलाला धमकी देखील दिली होती. माझा मुलगा लय घाबरला होता. विकास मतेने माझ्या लेकला घाबरवून घाबरवून मारलं. माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, असं मृत तरुणाच्या आईने म्हटलं आहे.
advertisement
ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात
विक्रमने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रम आणि पुण्यातील खडकवासला येथील सृष्टी मते यांचे गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाचे आमिष दाखवून नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण सांगत सृष्टीने लग्नास नकार दिला. इतकंच नाही तर २७ डिसेंबर २०२५ पासून तिने आणि तिच्या बहिणीने विक्रमला फोन करून मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली होती.
मोबाईलमधील डेटा जबरदस्तीने डिलीट
या प्रकरणातील छळ इतका वाढला होता की, ५ जानेवारी रोजी विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील खाजगी डेटा जबरदस्तीने डिलीट करण्यात आला. यावेळी त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. सृष्टीचे वडील विकास मते यांनीही विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सततच्या या दहशतीमुळे विक्रम प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत होता.
आई मला माफ कर…
अखेर १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० च्या सुमारास विक्रमने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असा स्पष्ट उल्लेख त्याने या सुसाईड नोटमध्ये केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हा पुरावा जप्त केला असून मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्सचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपी फरार
दरम्यान, याप्रकरणी बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची बहीण श्रृती आणि वडील विकास मते या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शोध घेतला जात आहे. एका तरुण मुलाचा असा करुण अंत झाल्याने कोळपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बारामतीत या घटनेची मोठी चर्चा आहे.
