शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बीड जिल्ह्यातील एक कुटुंब चार वर्षांपूर्वी पुण्यात कामानिमित्त आलं. वडील फुटपाथवर वस्तू विकतात, तर आई घरकाम करून संसार चालवते. चार मुलींपैकी मोठी मुलगी इयत्ता सातवीत शिकत होती. मात्र आर्थिक अडचणींमुळे आणि नातेवाईकांच्या दबावामुळे पालकांनी तिचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दसऱ्यानंतर दिवाळीत गावी जाऊन लग्न करण्याचं नियोजन त्यांनी केलं होतं. या मुलीचं शाळेत जाणं अचानक बंद झाल्याने वर्गशिक्षिकेला शंका आली. चौकशीदरम्यान तिच्या मैत्रिणीकडून समजलं की तिचं लग्न ठरलं आहे.
advertisement
शिक्षिकेने तात्काळ ही माहिती दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे यांना दिली. हिंगे यांनी तत्काळ त्या कुटुंबाच्या घरी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. चौकशीत पालकांनी लग्न ठरवल्याची कबुली दिली. यानंतर हिंगे यांनी अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलतेने त्यांना समजावलं. कमी वयात लग्न लावल्यास कायदेशीर कारवाई होईल, हे सांगितल्यावर मुलगी रडायला लागली आणि माझ्या पप्पांना पकडून नेऊ नका असं म्हणाली. त्या क्षणीच पालकांच्या मनात परिवर्तन झालं. मुलीच्या डोळ्यांतील भीती आणि तिचं प्रेम पाहून वडिलांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी डोळ्यात अश्रू आणत आम्ही कितीही कष्ट करू पण मुलींना शिकवू असं ठामपणे सांगितलं.
यानंतर त्या मुलीला पुन्हा शाळेत पाठवण्यात आलं. मलाही तुमच्यासारखं बनायचं आहे, असं सांगत तिने हिंगे यांना वचन दिलं. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी दामिनी पथकाच्या कामाचं मनापासून कौतुक केलं. सोनाली हिंगे म्हणाल्या, आम्ही नियमितपणे विविध शाळांमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधतो. गुड टच-बॅड टच, आत्मविश्वास आणि शिक्षणाचं महत्त्व या विषयांवर आम्ही समुपदेशन करतो. अशा अनेक घटनांमध्ये योग्य वेळी मार्गदर्शन करून मुलींचं आयुष्य बदलता येतं, हे आम्हाला माहीत आहे.
ही घटना समाजाला एक मोठा संदेश देऊन जाते. की अडचणी कितीही असल्या, तरी मुलींचं शिक्षण थांबवू नये. दामिनी पथकाने केवळ एका मुलीचं आयुष्य वाचवलं नाही, तर एका कुटुंबाचा आणि समाजाचा विचार बदलला. त्यांच्या संवेदनशील समुपदेशना मुळे एका मुलीच्या भविष्यात पुन्हा प्रकाश फुलला आहे. आज तीच मुलगी पुन्हा नव्या उत्साहाने शिक्षण घेत आहे आणि मोठं अधिकारी बनून समाजासाठी काम करण्याचं स्वप्न पाहते आहे. तिच्या या नव्या प्रवासाची सुरुवात झाली ती दामिनी पथकाच्या सजगतेने आणि सोनाली हिंगे यांच्या संवेदनशीलतेने.