पुणे : मकर संक्रांत किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटी व्यापाऱ्यांना, तसेच फळ विक्रेत्यांना वेध लागतात ते आंब्याचे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची खरेदी विक्री सुरू व्हायला आता सुरुवात झाली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये आंब्याची पेटी दाखल झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे रत्नागिरी हापूस व केशर आंब्याची यावर्षीची पहिली आवक झाली.
advertisement
पुण्यात दाखल झालेल्या आंब्याची जलाल काझी जैतापूर रत्नागिरी येथून आवक झाली. मार्केट यार्ड येथील दाखल झालेल्या पहिल्या 4 पेटींमध्ये दोन हापूस आंब्याची पेटी व दोन पेट्या या केशर आंब्याच्या होत्या. बाजारातील पहिली आवक सुधीर बबनराव मनसुख यांच्या गाळ्यावर झाली. या वर्षाच्या सर्वात उच्चांकी भाव मिळाला. यावर्षीच्या पहिल्या पेटीला 15 हजार रुपये भाव मिळाला. 15 हजर रुपयांच्या पेटीत 3 डझन आंबे आहेत. ही खरेदी बाजारातील युवराज काची यांनी केली.
15 मार्च पासून आंब्याची आवक सुरळीत
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आलेला मोहर जपून ठेवल्यामुळे आता आंबे काढता आले. यंदा सीझन फेब्रुवारी महिन्याच्या अंती चालु होईल आणि त्यानंतर 15 मार्च पासून आंब्याची आवक सुरळीत चालु होईल अशी माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.
मार्च महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात
यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे. मार्च महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे. एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून मार्च किंवा महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरु होईल.
