नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा आणि जळगाव परिसरातील काही भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी नवस फेडण्यासाठी आणि पुजण्यासाठी शर्यतीचे दोन बैल सोबत आणले होते. जेजुरी गडावर कोणतेही प्राणी नेण्यास सक्त बंदी असतानाही, या भाविकांनी जुन्या जेजुरी मार्गावरील पायऱ्यांवरून बैल वर नेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक दुकानदारांनी त्यांना मज्जाव केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत बैल पुढे नेण्यात आले.
advertisement
बैल उधळले अन् भयंकर प्रसंग ओढवला
सकाळी ११ च्या सुमारास अचानक हे बैल उधळले आणि पायरी मार्गावरून वेगाने खाली धावू लागले. अरुंद पायऱ्या आणि भाविकांची गर्दी यामुळे तिथे एकच गोंधळ माजला. उधळलेल्या बैलांपासून जीव वाचवण्यासाठी भाविकांनी सैरावैरा धाव घेतली, अनेकजण पायऱ्यांवरून घसरून पडले. यात शिवा मोहे (बुलढाणा), विशाल कवलकार (बुलढाणा) आणि ज्योती पवार (जळगाव) हे तिघे जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, मोठी हानी टळली असली तरी या घटनेने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देवस्थान प्रशासन आक्रमक
या घटनेनंतर श्री मार्तंड देवस्थानने कडक पवित्रा घेतला आहे. "गडावर प्राणी आणण्यास बंदी आहे, असे वारंवार सांगूनही भाविकांनी नियम धाब्यावर बसवले. यापुढे अशा प्रकारे प्राणी आणणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिला आहे.
