नेमकी घटना काय?
विरेंद्र सिन्हा (वय ३२, रा. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. विरेंद्र हे बाणेर येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होते. गुरुवारी (१२ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास त्यांची चारचाकी गाडी लायन्स पॉइंट येथे संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासात असे समोर आले की, आत्महत्या करण्यापूर्वी विरेंद्र यांनी आपल्या पत्नीला आणि मित्रांना ई-मेल आणि मेसेजद्वारे काही टोकाचे संकेत दिले होते.
advertisement
लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. ज्या ठिकाणी गाडी उभी होती, त्याच समोरील २५० फूट खोल दरीत विरेंद्र यांचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढला.
आठवडाभरात दुसरी धक्कादायक घटना
लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर मृत्यूचे सावट गडद होत चालले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच मुंबईतील श्रेया नरेंद्र पाटील (वय २०) या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने टायगर पॉइंटवरून ४०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली होती. कौटुंबिक वादातून तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले होते. श्रेयाचा मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाला ३६ तास झुंजावे लागले होते. या घटनेची चर्चा संपत नाही तोच विरेंद्र यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
लायन्स आणि टायगर पॉइंटसारख्या ठिकाणी वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, "प्रशासनाने तातडीने या पर्यटनस्थळांवर उंच संरक्षक जाळ्या आणि कडक सुरक्षा रक्षक तैनात करावेत," अशी मागणी मावळ मनसेने केली आहे. अन्यथा, ही पर्यटनस्थळे 'सुसाईड पॉइंट' म्हणून ओळखली जातील, अशी भीती व्यक्त होत आहे.
