बिबवेवाडी भागात एकतर्फी प्रेमातून राष्ट्रीय कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी शुक्रवारी न्यायालयात केली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
नेमकी घटना काय घडली होती?
बिबवेवाडीतील यश लॉन परिसरातील मैदानावर १५ वर्षीय शाळकरी मुलगी कबड्डीच्या सरावासाठी जायची. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीला मैदानात गाठून तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी शुभम उर्फ ऋषीकेश बाजीराव भागवत (वय २२) याला अटक करण्यात आली होती. भागवत याच्याविरुद्ध खून करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
advertisement
'आरोपीने मुलीचा निर्घृण खून केला. तिचा गळा चिरला. आरोपीने तिच्यावर २२ वार केले. मृत्यू झाल्यानंतरही तो मुलीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करत होता. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तो दयेस पात्र नाही. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा योग्य होईल. समाजातही योग्य तो संदेश जाईल,' असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील झंजाड यांनी केला. या प्रकरणात सरकार पक्षाकडून १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. बचाव पक्षाकडून या प्रकरणात १६ ऑक्टोबर रोजी अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे.