घायवळचं लंडनमधील लोकेशन सापडलं
युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळचा व्हिसा 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे. त्याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे तो तेथे राहत आहे. एवढंच नव्हे तर, युके हाय कमिशनने निलेश घायवळच्या सध्याच्या ठिकाणाबाबत तपास करण्यासाठी तेथील स्थानिक पोलिसांना कळवले असल्याची माहिती देखील पुणे पोलिसांना दिली आहे. त्यामुळे, पुणे पोलीस आता पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्याची शक्यता आहे.
advertisement
घायवळ विरोधा 'ब्लू कॉर्नर' नोटीस
पुणे पोलिसांनी यापूर्वीच घायवळ विरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी करण्यासाठी इंटरपोलशी संपर्क साधला होता. ब्लू कॉर्नर नोटीसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तीची ओळख आणि ठावठिकाणा शोधण्यास मदत मिळते. या नोटीसमुळे आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणा घायवळचा शोध घेण्यास मदत मिळते. पण आता घायवळ याला लंडन पोलिसांनी शोधून काढल्याने पुणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू
दरम्यान, निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) म्हणजेच मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुणे पोलिसांना घायवळला भारतात परत आणण्यासाठी आणि त्याला कठोर शिक्षा देण्यासाठी अधिक बळ मिळाले आहे. पुणे पोलिसांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांमुळे निलेश घायवळच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्याला लवकरच भारतात परत आणण्याची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे.
