नेमकी घटना काय?
फारूख सत्तार शेख (वय २५, रा. भोसरी) हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला ८ एप्रिल २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी फाटा येथे वास्तव्य करत होता. १८ डिसेंबर रोजी त्याने एका ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेने आळंदी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला.
advertisement
पिंपरी-चिंचवड पोलिसांतर्फे हद्दपार गुंडांवर लक्ष ठेवण्यासाठी 'हद्दपार आरोपी दत्तक योजना' राबवली जाते. या योजनेअंतर्गत फारूख शेखवर नजर ठेवण्याची जबाबदारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे अंमलदार भागवत शेप यांच्याकडे होती. हद्दपार गुंड शहरात कधी आला आणि तो कोठे राहत होता, याची माहिती अद्ययावत ठेवण्यात शेप यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेने पोलीस आयुक्तालय हद्दीतील हद्दपार गुंडांच्या निगराणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या काळात पोलिसांनी ३०७ गुंडांना हद्दपार केले असले तरी, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ४५९ गुंडांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. यावरून मोठ्या संख्येने हद्दपार गुंड शहरात छुप्या पद्धतीने वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
