पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचे जवळपास निश्चित केले आहे. तर शरद पवार गटाने ठाकरे गटालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव अजित पवारांसमोर मांडला आहे. मात्र, यामुळे शरद पवार गटात नाराजी उफाळून आली होती. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने पक्षाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. अखेर सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे.
advertisement
प्रशांत जगताप यांनी पुणे महानगरपालिकेच्या परिसरात पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहीर केला आहे. प्रशांत जगताप यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी पार्टीच्या विरोधात कोणी घोषणाबाजी देणार नाही. पार्टीच्या विरोधात कोणीही ओरडणार नाही तुम्हाला माझी शपथ, असे म्हणत आपला निर्णय जाहीर केला आहे. प्रशांत जगताप पक्ष कार्यालयात गेलेच नाहीत. शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबतचा स्वतःचा फोटो दाखवत निर्णय जाहीर केला यावेळी ते भावूक झाले.
पक्षाने दिलेल्या संधीसाठी मी कायम ऋणी : प्रशांत जगताप
प्रशांत जगताप म्हणाले, पक्षाने दिलेल्या संधीसाठी मी कायम ऋणी आहे. मी फक्त पदासाठी काम करणार कार्यकर्चा नाही. शरद पवारांवर माझा काल, आज आणि उद्याही नितांत विश्वास आहे. मी फॅशन म्हणून राजकारणात आलो नाही. पुरोगामी विचारांसाठी मी लढत राहणार आहे. माझ्या मनात विचारांची घालमेल सुरू होती, अखेर मी निर्णय घेतला आहे. मी पक्षाचा राजीनामा दिला असून राजकारण, समाजकारण सुरूत ठेवणार आहे.
नेमकं काय म्हणाले प्रशांत जगताप?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार ! 27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल ! आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !
