नराधम आरोपी तब्बल पाच वर्षे पीडित तरुणीवर अशाप्रकारे वारंवार अत्याचार करत होते. या प्रकरणी समर्थनगर पोलीस ठाण्यात एकूण १५ जणांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ८ आरोपींचा न्यायालयाने आता जामीन अर्ज फेटाळला. शंतनू सॅम्युअल कुकडे (५३), ऋषिकेश गंगाधर नवले (४८), जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतिक पांडुरंग शिंदे (३६), विपिन चंद्रकांत बिडकर, सागर दशरथ रासगे (३५) आणि रौनक भरत जैन (३८) अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपींची नावं आहेत.
advertisement
पीडित तरुणीने या लैंगिक अत्याचाराची व्यथा भूतान येथून ऑनलाइन माध्यमाद्वारे न्यायालयासमोर मांडली. आरोपींनी पीडित तरुणीच्या निराधार व असहाय्यतेचा फायदा घेत ५ वर्षे तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी हा आदेश दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शंतनू कुकडे हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने भूतान येथील पीडित तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून पुण्यात बोलवून घेतलं होतं. इथं आल्यानंतर आरोपीनं इतर आरोपींच्या मदतीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. हा गुन्हा २०२० ते जानेवारी २०२५ दरम्यान नानापेठ येथील सदनिकेत, रायगडमधील सरवे बीच येथील बंगला व पानशेत येथील एका हॉटेलमध्ये घडला. या प्रकरणी पीडितेने न्यायालयात जबाब नोंदविला आहे.
आरोपी पार्टी आयोजित करून पीडितेला जबरदस्तीने नाचायला लावायचे, तिला गुंगी आणणारे द्रव पाजून सामूहिक बलात्कार करायचे, असे तपासात निष्पन्न झाले आहे. शंतनू कुकडे हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, रेड हाउस फाउंडेशन या बेकायदा संस्थेच्या माध्यमातून गरीब महिलांना आधार देण्याच्या बहाण्याने त्यांचे शारीरिक शोषण करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.