नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील टाटा गार्ड रूम परिसरात हवाई दलाचा सुरक्षित आणि प्रतिबंधित भाग आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास एक २५ वर्षीय तरुण या भागातील संरक्षक भिंतीवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. हा भाग अतिशय संवेदनशील असून, तिथे केवळ हवाई दलाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेशाची परवानगी आहे.
advertisement
हा तरुण भिंतीवर चढलेला असताना गस्त घालणाऱ्या हवाई दलाच्या जवानांच्या नजरेस पडला. जवानांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, घाईघाईत भिंतीवरून खाली पडल्यामुळे तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याला तातडीने हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले.
केवळ 'उत्सुकतेपोटी' धाडस: हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा या तरुणाची चौकशी केली, तेव्हा त्याने धक्कादायक कारण सांगितले. हवाई दलाचा अंतर्गत भाग नेमका कसा असतो, हे पाहण्याच्या 'उत्सुकतेपोटी' त्याने ही भिंत ओलांडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. याप्रकरणी कनिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार सिंह यांनी फिर्याद दिली असून, विमानतळ पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३२९ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे घुसखोरी करणाऱ्या एका तरुणावर कारवाई करण्यात आली होती.
