काय घडलं?
मूळच्या नांदेड येथील असलेल्या शोभा विजय वाघमारे या सोमवारी (१६ मार्च) मध्यरात्री दोनच्या सुमारास उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडने जात होत्या. यावेळी अचानक सहा कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांना घेरले. शोभा यांनी दगड उचलून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र या हिंस्त्र कुत्र्यांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी त्यांच्या अंगावरील कपडे फाडून काढले आणि हात, पाय, मान तसंच तोंडाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. सुमारे १५ मिनिटे हा मृत्यूचा तांडव सुरू होता. प्रचंड रक्तस्रावामुळे शोभा यांनी जागीच प्राण सोडले.
advertisement
सोमवारी सकाळी नागरिकांना विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात बलात्कार करून खुनाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, चाकण उत्तर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, कुत्र्यांच्या हल्ल्याची ही धक्कादायक बाब उघड झाली.
या घटनेमुळे चाकण, मेदणकरवाडी आणि परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
