सारसबागेजवळील पर्वती पायथ्याशी असलेल्या समाधान भेळची सुरुवात 1970 साली करण्यात आली. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ या ठिकाणची मटकी भेळ पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे. सुरुवातीच्या काळात ही भेळ केवळ तीन ते पाच रुपयांना मिळत होती. काळानुसार महागाई वाढली असली तरी आजही या ठिकाणची भेळ चवीत तितकीच खास असून सध्या ती 60 रुपयांना मिळते.
advertisement
गुढीपाडव्यासाठी खरेदी करा आकर्षक नॅनो गुढी, किंमत फक्त 90 रुपयांपासून, पुण्यात हे आहे लोकेशन
स्थानिकांमध्ये समाधान मामा भेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्टॉलची खासियत म्हणजे त्याची साधी पण चवदार रेसिपी. मुरमुरे, शेव, शेव-पापडी, बुंदी, मटकी आणि खास मसाला यांचा वापर करून भेळ तयार केली जाते. यामध्ये ओली भेळ, मटकी भेळ आणि सुकी भेळ असे विविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. या सर्व प्रकारांमध्ये चवीचा समतोल राखला जात असल्याने अनेक जण या भेळीचे चाहते झाले आहेत.
वयाच्या 65 व्या वर्षीही अर्जुन कांबळे हे हा व्यवसाय मनापासून सांभाळत आहेत. अनेक वर्षांपासून ते ग्राहकांना त्याच पारंपरिक पद्धतीने भेळ बनवून देत आहेत. पूर्वी या भागात इतकी गर्दी नसायची. पण हळूहळू लोकांमध्ये या भेळीची चव प्रसिद्ध झाली आणि आता दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहक येथे येतात, असे कांबळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, फक्त पुणेकरच नव्हे तर बाहेरगावाहून येणारे पर्यटकही सारसबाग परिसरात फिरायला आल्यावर या ठिकाणची भेळ चाखायला आवर्जून येतात. संध्याकाळच्या वेळी येथे ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अनेक जण वर्षानुवर्षे येथे येऊन त्याच चवीचा आनंद घेत असल्याचे दिसून येते.
पारंपरिक चव, साधेपणा आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता यामुळे समाधान भेळ आजही पुणेकरांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. बदलत्या काळात अनेक खाद्यपदार्थांचे नवे पर्याय उपलब्ध झाले असले तरी सारसबागेजवळील या जुन्या मटकी भेळीची चव मात्र आजही तितकीच लोकप्रिय असल्याचे दिसून येते.





