लाखोंचा गंडा घालणाऱ्या टिपू पठाण टोळीवर कारवाई
हडपसर विभागात बनावट दस्तऐवज (fake documents) तयार करून नागरिकांच्या मालमत्तांवर अवैधपणे कब्जा करणाऱ्या आणि त्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या या टोळीवर काळेपडळ पोलिसांनी मंगळवारी मोठी मोहीम राबवली. या कारवाईत मुख्य संशयित रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या सहकाऱ्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच, या टोळीने केलेल्या अनधिकृत बांधकामांवर पाडकामाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे.
advertisement
बँक खाती सील
या प्रकरणी काळेपडळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी टिपू पठाण याची एक मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. टिपू पठाण याच्यासोबत सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख आणि मुनीर शेख या साथीदारांचीही बँक खाती सील करण्यात आली आहेत. त्यांच्या खात्यांमधील संशयास्पद पैशांच्या व्यवहारांची कसून चौकशी गुन्हे शाखा (Crime Branch) करत आहे.
इनोव्हा फोर व्हीलर कार जप्त
पोलिसांनी आरोपींच्या घरांवर छापा टाकला असता, तिथे AC, TV, फ्रिज, वॉशिंग मशिन यांसारख्या 4 ते 5 लाख रुपयांच्या महागड्या वस्तू आढळल्या. या वस्तूंच्या खरेदीची योग्य बिले सादर करण्यात कुटुंबीय अपयशी ठरले. याशिवाय, दोन नोटरीकृत साठेखत मिळाले असून, त्यांची सत्यता पडताळली जात आहे. याच तपासादरम्यान, टिपू पठाण याच्या नावावर असलेली लाखो रुपये किमतीची इनोव्हा फोर व्हीलर कार जप्त करण्यात आली आहे. ही कार 30 एप्रिलपासून टोयोटाच्या वाघोली येथील शोरूममध्ये सर्व्हिसिंगसाठी लावलेली होती.
11 गुंठे जागेची खोटी कागदपत्रे
दरम्यान, या टोळीने हडपसर परिसरातील 11 गुंठे जागेची खोटी कागदपत्रे बनवून ती जागा बळकावली. त्यांनी जागेवरील कंपाऊंड तोडून बेकायदेशीर बांधकाम उभे केले आणि ती जागा इतरांना भाड्याने देऊन मोठी आर्थिक कमाई केली. सध्या महापालिकेचे पथक या बेकायदा बांधकामांना पाडण्याचे काम करत आहे.