सोमवारी रात्री मुळशीतील आंदगावमधून अटक
रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी मुळशीतील आंदगाव तालुक्यातून अटक केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रूपेश मारणे फरार होता. अखेर रुपेश सोमवारी रात्री मुळशीतील आंदगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मोक्काचा गुन्हा दाखल
कोथरूड येथील एका तरुणाला मारहाण प्रकरणात गजानन मारणेसह रूपेश मारणे याच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल होता. मात्र तेव्हापासून रूपेश मारणे हा पोलिसांना चकवा देत फरार होता. गजानन मारणेनंतर रुपेश टोळीची सुत्र चालवत होता, अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली होती. आता रुपेशला अटक झाल्यानंतर अनेक मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ढाब्यावर ‘मटण पार्टी’
दरम्यान, गजानन मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात सांगली कारागृहात घेऊन जाताना हायवेवरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी पाच पोलिसांचं निलंबन देखील केलं होतं. गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे गजा मारणेचा मुक्काम पुन्हा जेलमध्येच असणार आहे.
