बी.टेक विद्यार्थ्याचा फसवणुकीत सहभाग
कर्वेनगर येथील बी.टेकचा विद्यार्थी असलेल्या हर्षद धंतोलेला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या शिक्षित तरुणांनी ऑनलाईन फसवणुकीचे जाळे विणले होते. भांडारकर रोडवरील एका ८२ वर्षीय वृद्धाला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून धमकावण्यात आले. बनावट 'मनी लॉन्ड्रिंग' प्रकरणाची भीती दाखवून वृद्धाला 'व्हर्च्युअल कोर्टरूम'मध्ये डिजिटल अरेस्ट करण्यात आले आणि विविध खात्यांवर १०.७५ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
advertisement
रील स्टारचे कनेक्शन अन् चीनचे धागेदोरे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या एका रील स्टारचा मुख्य सहभाग आहे. हा रील स्टार मुख्य संशयितांच्या सूचनेवरून पैशांची अफरातफर करण्यासाठी 'म्युल अकाउंट्स' (भाड्याने घेतलेली बँक खाती) गोळा करण्याचे काम करत होता. मोठी रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली असून तो सध्या फरार आहे.
चेहरा बदलणारी 'मैत्रीण' पोलिसांच्या रडारवर
या प्रकरणात रील स्टारच्या एका मैत्रिणीचीही चौकशी करण्यात आली आहे. ती व्हिडिओमध्ये विविध ऑनलाईन फिल्टर्स वापरून चेहरा बदलत असे, जेणेकरून तरुणांची ओळख पटू नये. तिच्या खात्यातही फसवणुकीची रक्कम जमा झाली असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट चीनशी जोडले गेले असल्याने सायबर पोलीस आता अधिक सखोल तपास करत आहेत.
