याप्रकरणी दिग्विजय सुरेश सुतार (वय 30, रा. नारायणनगर, हिंजवडी) यांनी शनिवारी (दि. 27 डिसेंबर) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्याशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 ते 40 टक्के परतावा मिळेल, असे सांगून त्यांनी फिर्यादी यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवून त्यावर काही प्रमाणात परतावा देण्यात आला. त्यामुळे फिर्यादी यांचा संशय दूर होऊन त्यांनी अधिक गुंतवणूक करण्यास होकार दिला.
advertisement
यानंतर संशयितांनी विविध बँक खात्यांवर आणि डिजिटल वॉलेट्सवर पैसे जमा करण्यास सांगितले. वेगवेगळ्या कारणांची माहिती देत त्यांनी वेळोवेळी मोठ्या रकमा घेतल्या. सुरुवातीला परतावा मिळाल्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र, नंतर परतावा मागितल्यावर ‘तांत्रिक अडचण’, ‘कर भरणा’, ‘प्रोसेसिंग फी’ अशा विविध कारणांची बतावणी करून आणखी पैशांची मागणी करण्यात आली.
अखेर संशयितांनी कोणताही परतावा न देता संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी हिंजवडी पोलिसांकडे धाव घेतली. तपासात एकूण 33 लाख 96 हजार 738 रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे. बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक, आयपी अॅड्रेस आणि डिजिटल व्यवहारांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, जादा परताव्याच्या आमिषाला बळी न पडता कोणतीही ऑनलाइन गुंतवणूक करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
