नेमकी कारवाई काय?
संपत बाबूराव दर्शिले (वय ७७, रा. रसिकवाडी, जांबे) असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. संपत दर्शिले यांचे जांबे गावातील रसिकवाडी रस्त्याच्या कडेला शालीमकर स्पोर्ट्स एरिना शेजारी शेत आहे. या शेतात त्यांनी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना अंमली पदार्थ असलेल्या अफूच्या झाडांची लागवड केली होती.
गुंडा विरोधी पथकाला या बेकायदा शेतीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम जगदाळे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शेतात छापा टाकला.
advertisement
१६ किलो अफू जप्त
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत शेतातून १६ किलो ८१० ग्रॅम वजनाची अफूची हिरवीगार झाडे जप्त करण्यात आली आहेत. बाजारात या झाडांची किंमत मोठी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विनापरवाना अफूची लागवड करणे हा गंभीर गुन्हा असल्याने, पोलिसांनी सर्व माल जप्त करून शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि रस्त्याकडेला असलेल्या शेतात अशा प्रकारे अफूची लागवड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अफू नेमका कोणाला विकला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
