ट्रेकिंगला जातीये असं आईला सांगून निघाली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी रोजी श्रेयाने घरी 'ट्रेकिंगला जात आहे' असं सांगितलं आणि ती घराबाहेर पडली. सकाळी साधारण 11 च्या सुमारास ती लोणावळ्यात पोहोचली होती. ड्युक्स नोज परिसरात काही वेळ फिरल्यानंतर ती रिक्षाने टायगर पॉईंटला गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथल्या एका स्टॉलमागे आपली बॅग ठेवून तिने लोखंडी कुंपणाच्या तुटलेल्या भागातून अंदाजे 400 फूट खोल दरीत उडी घेतल्याची शक्यता आहे.
advertisement
स्टॉलमागे बेवारस बॅग सापडली
श्रेया सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी काळजीपोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. दुसरीकडे, टायगर पॉईंटवरील दुकानदाराला एका स्टॉलमागे बेवारस बॅग सापडली. त्या बॅगेत असलेल्या आयडी कार्ड वरून दुकानदाराने तातडीने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि ही बाब उघडकीस आली.
तब्बल 36 तास शोधमोहीम
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल आणि परिसर दुर्गम असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर ड्रोनच्या सहाय्याने तब्बल 36 तास शोधमोहीम राबवण्यात आली. 1 फेब्रुवारी रोजी शोधपथकाला श्रेयाचा मृतदेह दरीत आढळून आला. रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांनंतर तिचा मृतदेह बाहेर काढला.
प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, प्राथमिक पोलीस तपासात कौटुंबिक वादातून श्रेयाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईतून लोणावळ्यात येऊन अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि रेल्वे स्थानक ते पॉईंट्सपर्यंतच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
