प्रकल्पाचे स्वरूप आणि नियोजन
हा प्रकल्प पुणे-शिरूर उन्नत महामार्गावर दुसऱ्या मजल्यावर उभारला जाणार आहे. या साडेबारा किलोमीटरच्या अंतरात एकूण ११ मेट्रो स्टेशन्स प्रस्तावित आहेत. या पाहणी दौऱ्यात प्रत्येक स्टेशनच्या जागेची निश्चिती करण्यात आली असून, कामादरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि वाहतूक नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचे काम करताना रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना ५-५ मीटर अशी एकूण १० मीटर जागा प्रकल्पासाठी वापरली जाईल. मेट्रोचे काम सुरू असतानाही वाहतुकीसाठी दोन लेन आणि पादचारी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण करावे लागणार आहे. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास हा प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे.
advertisement
या पाहणी दौऱ्यात वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव, महावितरण, पीडब्ल्यूडी आणि महापारेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मेट्रो मार्गामुळे वाघोली आणि परिसरातील आयटी हबला जोडणाऱ्या नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मोठी सुटका होणार आहे.
