ब्लॅकमेलिंगचा फास
मिळालेल्या माहितीनुसार, विजय लक्ष्मण गावडे (वय ५०, रा. नन्हे, पुणे) आणि पीडित महिला यांची २००५ मध्ये ओळख झाली होती. २००६ ते २०१७ या कालावधीत त्यांच्यात प्रेमसंबंध होते. यादरम्यान विजयने महिलेसोबतचे काही खासगी क्षण मोबाईलमध्ये चित्रित करून ठेवले होते. लग्नानंतरही या फोटोंचा आणि व्हिडीओंचा वापर करून त्याने महिलेला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
advertisement
पीडितेने वैद्यकीय उपचारासाठी विजयकडून काही रक्कम घेतली होती. तिने व्याजासह सर्व पैशांची परतफेड केली असतानाही, विजयने पुन्हा पैशांची मागणी लावून धरली. पैसे न दिल्यास व्हिडीओ पती आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. याच भीतीपोटी त्याने महिलेला कोल्हापूर येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिच्या घरी जाऊनही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
विजयच्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर धाडस एकवटून तिने १५ मार्च रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विजय गावडेला अटक केली आहे. आरोपी हा बेकायदेशीर सावकारी करत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
