या तपासाचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. २६ डिसेंबर रोजी दुपारी कोयते आणि तलवारीचा धाक दाखवून या आरोपींनी सराफी पेढी लुटली होती. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांची सहा विशेष पथके तैनात करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटल्यानंतर ते वेल्हे तालुक्याच्या दिशेने गेल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने दोन रात्री त्यांचा पाठलाग केला. एका डोंगराळ भागात पोलिसांना पाहून दरोडेखोरांनी पळ काढला, मात्र समोर नदी आल्याने त्यांनी दुचाकी सोडून पाण्यात उड्या घेतल्या. यावेळी पोलीस अंमलदार गणेश धनवे आणि सागर नामदास यांनीही जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली. गणेश धनवे यांनी वेगाने पोहत नदीचा पलीकडचा तीर गाठला. ज्यामुळे आरोपी अंकुश कचरे हा बाहेर येताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
advertisement
अटकेत असलेला अंकुश कचरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल आहेत. तपासात असे समोर आले आहे की, या टोळीने कात्रजवरून खानापूरला येऊन दोन ते तीन वेळा दुकानाची रेकी केली होती. मालक आणि कामगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांनी भरदुपारी जेव्हा गर्दी कमी असते, अशी वेळ दरोड्यासाठी निवडली होती. पोलिसांनी या कारवाईत ७० लाख ३२ हजार रुपयांचे सोने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि शस्त्रे जप्त केली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या धाडसी पथकाने ही कारवाई यशस्वी केली असून, आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
