आईची माया: पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या या तरुणाला उच्च रक्तदाबामुळे दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे धक्कादायक निदान झाले होते. गेल्या वर्षभरापासून त्याचे डायलिसिस सुरू होते, मात्र प्रकृती खालावत चालल्याने प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता. मुलाचे वडील साफसफाईचे काम करून जेमतेम १३ हजार रुपये महिना कमवतात. खाजगी रुग्णालयांनी सांगितलेला १५ लाख रुपयांचा खर्च या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. अशा वेळी मुलाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यासाठी आईने कसलाही विचार न करता आपले अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
ससून रुग्णालयातील समाजसेवा विभाग आणि मूत्रपिंड तज्ज्ञांनी या कुटुंबाला केवळ वैद्यकीयच नव्हे, तर कायदेशीर आणि आर्थिक मार्गदर्शनही केले. विविध सरकारी योजना आणि संस्थांच्या मदतीने हा खर्च शून्यावर आणण्यात आला. आई आणि मुलाच्या सर्व वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, २७ डिसेंबर रोजी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांच्या एका मोठ्या पथकाने ही शस्त्रक्रिया पार पाडली.
आईने दिलेले हे दान यशस्वी ठरले असून, शस्त्रक्रियेनंतर माय-लेक दोघेही सुखरूप आहेत. ससूनमधील ही ३५ वी यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली. या यशोगाथेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मातृत्वाची शक्ती आणि योग्य वैद्यकीय मदत असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते.
