नेमकी घटना काय?
बुधवारी सकाळी शाळा भरल्यानंतर क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीची तपासणी केली. ज्या विद्यार्थ्यांची नखे वाढलेली होती किंवा ज्यांनी केस कापले नव्हते, अशा लहान मुलांच्या हातावर शिक्षकांनी मोठ्या अक्षरात 'नेल कट' असे पेनाने लिहिले. इतकेच नाही, तर या मुलांना भर उन्हात मैदानाचे चार फेरे मारण्याची कठोर शिक्षाही दिली.
दिवसभर हात लपवून वावरली मुले
advertisement
हातावर लिहिलेल्या त्या शब्दांमुळे ही लहान मुले प्रचंड अस्वस्थ झाली होती. आपला हात कोणी पाहू नये, या भीतीने मुलांनी दिवसभर हात लपवून ठेवले. शाळा सुटल्यानंतर जेव्हा पालकांनी आपल्या मुलांना रडवेल्या चेहऱ्याने पाहिले आणि त्यांच्या हातावरील ते शब्द वाचले, तेव्हा हा संतापजनक प्रकार समोर आला. "आम्हाला या शाळेत पाठवू नका," अशी विनवणी करत मुले पालकांसमोर ढसाढसा रडली.
पालकांचा रोष आणि शाळेची भूमिका
या शाळेत पहिली-दुसरीसाठी ३० ते ४० हजार रुपये शुल्क आकारले जाते. "शाळेत डायरी आणि व्हॉट्सअॅप ग्रुप असतानाही मुलांच्या हातावर अशा प्रकारे लिहिणे हे त्यांच्या मानसिक आरोग्याशी खेळण्यासारखे आहे," असे मत पालकांनी व्यक्त केले आहे. पालकांनी मुख्याध्यापिका मनीषा धावडे यांच्याकडे धाव घेतली, मात्र केवळ तोंडी सूचना देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील शालेय शिस्तीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या अघोरी शिक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
