नेमकं घडलं तरी काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी इसम नामदेव विकास पवार रिक्षामध्ये बसून पुणे-सोलापूर हायवेने घरी जात होते. रिक्षा श्री दत्त मिसळ हॉटेल समोर पोहोचताच रिक्षा चालक आणि इतर तीन आरोपींनी त्यांना हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादीला रिक्षातून खाली ढकलून जखमी केले गेले
advertisement
त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील रोख रक्कम तीन हजार पाचशे रुपये, मोबाईल फोन आणि अन्य वस्तू जबरदस्तीने काढून नेल्या. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपी अदिल शेख (वय 24), हबिब शेख (वय 21), बबलु अग्रवाल (वय 19)यांना अटक केली. या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे. ज्यालाही पोलीसांनी ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चोरीची ऑटो रिक्षा असा सुमारे 3 लाख 42 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीनुसार, आरोपी नियमितपणे एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रिक्षा चोरी करून दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवाशांना मारहाण करून लूट करत होते.
लोणी-काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच संबंधित कलमांतर्गत कारवाई सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वाहनांमध्ये योग्य सुरक्षा उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणेकरांसाठी ही घटना धक्कादायक असून, पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठ्या गुन्ह्याला आळा बसला आहे. शहरातील वाहतुकीसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक काटेकोर केल्या जात आहेत, ज्यामुळे नागरिकांना प्रवासात धोका टाळता येईल.