पुण्यात खासगी क्लास चालवणाऱ्या एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुरेश दौलत रौंदळ (वय ४६, रा. कात्रज, पुणे) असे अटक केलेल्या क्लासचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश रौंदळ हा स्वारगेट परिसरात खासगी क्लासेस चालवतो आणि पीडित मुलगी त्याच्याकडे शिकायला येत होती. ९ ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी क्लासमध्ये एकटीच होती. याचा गैरफायदा घेत आरोपी रौंदळ याने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 'तू क्लासला येत असल्यापासून मला खूप आवडतेस, मी लवकरच शाळा सुरू करणार आहे. तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुला नोकरी देईन, सोन्याची अंगठीही देईन' असं आमिष दाखवून आरोपीनं मुलीशी अश्लील चाळे केले.
advertisement
क्लासचलाकाने अचानक केलेल्या या किळसवाण्या कृत्याने अल्पवयीन मुलगी खूप घाबरली. तिने घरी जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीच्या पालकांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठले आणि नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी सुरेश रौंदळ याला अटक केली आहे. या घटनेमुळे क्लासेसमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वारगेट पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.