रस्त्याने ये-जा करताना मिळवा 50 हजार रुपये
पुणे ट्रॅफिक पोलीस ॲपच्या माध्यमातून वर्षभरात सर्वाधिक वाहतूक नियमभंग नोंदवणाऱ्या नागरिकाला तब्बल 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. ही माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना पकडलेल्या 600 चालकांच्या समुपदेशन सत्रात दिली. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांचा सहभाग वाढवून शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा आहे.
advertisement
जाणून घ्या नक्की काय करावं लागेल?
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की नागरिक मोबाईलवरून विविध नियमभंगाचे फोटो किंवा व्हिडिओ ॲपवर अपलोड करू शकतात. यात ट्रिपल सीट प्रवास, फुटपाथवर पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट, बेदरकार वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर आणि डबल पार्किंग यांचा समावेश आहे.
हे ॲप सुरू झाल्यापासून पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 1.80 लाख तक्रारी मिळाल्या असून पडताळणीनंतर 1.16 लाख वाहनचालकांवर ऑनलाईन चलनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी सर्व वाहनचालकांना नियम पाळण्याचे आणि हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे. मद्यधुंद वाहनचालकांसाठी दर सोमवारी समुपदेशन सत्र घेतले जाते.
