नेमका प्रकार काय?
सिंहगड रस्ता वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर हे मंगळवारी सायंकाळी धायरी फाटा येथे कर्तव्य बजावत होते. यावेळी एकाच दुचाकीवरून तीन तरुण (ट्रिपल सीट) येत असल्याचे पाहून सेंगर यांनी त्यांना थांबवले आणि दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. आपल्यावर दंड का केला, या रागातून लकी गौरव आनंद (२१), साहिल प्रकाश चिकणे आणि श्रावण रमेश हिरवे या तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी श्रावण हिरवे याने हवालदार सेंगर यांच्या कानशिलात लगावली. इतकेच नव्हे तर, आरडाओरडा करत या तिघांनी हवालदाराचा गणवेश फाडून शासकीय कामात अडथळा आणला.
advertisement
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे पोलीस दप्तरी सराईत गुन्हेगार म्हणून नोंदवलेले आहेत. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या सत्रात वाढ झाली आहे. हडपसर आणि पुणे स्टेशन परिसरातील घटनांनंतर आता धायरीतील या प्रकारामुळे पोलीस दल आक्रमक झाले आहे.
वाहनचालकांकडून होणारी धक्काबुक्की आणि खोट्या आरोपांपासून पोलिसांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांना अधिकाधिक 'बॉडी कॅमेरे' पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कारवाई दरम्यान होणारा संवाद आणि गैरवर्तन कॅमेऱ्यात कैद होणार आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात १८ लाख बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ५४ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याची आकडेवारीही समोर आली आहे.
