राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रशासकीय मूल्यांकन अहवालानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) राज्यातील 13 सार्वजनिक अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी आले आहे. सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या या मूल्यांकनात पुणे विद्यापीठाला 100 पैकी केवळ 42 गुण मिळाले असून, या निकालामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
या मूल्यांकनात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, कर्मचाऱ्यांची अद्ययावत ज्येष्ठता सूची, सेवा पुस्तके अद्ययावत ठेवणे आणि ती डिजिटल करणे आदी महत्त्वाच्या निकषांचा समावेश होता. विशेष म्हणजे सेवा पुस्तके डिजिटल करणे या अत्यंत महत्त्वाच्या निकषात पुणे विद्यापीठाला अक्षरशः शून्य गुण मिळाले. याउलट मुंबई, कोल्हापूर, गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठांनी याच विभागात 20 पैकी 20 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.
पहिला क्रमांक कोणाचा?
या क्रमवारीत गोंडवाना विद्यापीठ पहिल्या, मुंबई विद्यापीठ दुसऱ्या तर छत्रपती शिवाजी विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विद्यापीठ मात्र तळाशी असल्याने शैक्षणिक गुणवत्तेनंतर आता प्रशासकीय गुणवत्ताही ढासळत असल्याचे संकेत मिळत आहेत. विद्यापीठाच्या वर्तुळात या घडामोडींवर मोठी चर्चा सुरू असून, हे मूल्यांकन ठरवून तर केले नाही ना? असा सवालही काही कर्मचारी आणि माजी पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने या निष्कर्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. अधिकृत माहिती न घेता मूल्यांकन कसे केले गेले? खासगी संस्थेला सरकारी डेटा कसा मिळाला? असा सवाल विद्यापीठाने उपस्थित केला आहे. तसेच सेवा पुस्तके डिजिटल करण्याबाबत कोणताही आदेश प्राप्त झालेला नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या दोन्ही मूल्यांकनांमध्ये पुणे विद्यापीठ सतत तळाशी येत असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तुटवडा, प्रलंबित कामकाज आणि डिजिटल प्रक्रिया यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विद्यापीठ हे गांभीर्याने घेत सुधारणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
