पुणे : ऐन गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या तोंडावर खुनाच्या घटनेने पुणे हादरलं आहे.वनराज आंदेकरच्या हत्येला पूर्ण झाले असताना खुनाचा बदला घेण्यात आला आहे. पुण्यात ऐन सणासुदीला टोळी युद्ध भडकले असून आंदेकर टोळीने आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नाना पेठेत ही हत्या करण्यात आली आहे. गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर हा वनराज आंदेकरच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा म्हणजे सख्खा भाचा आहे.
advertisement
पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉरची घटना घडली. हल्लेखोरांनी गोविंदवर तीन गोळ्या झाडल्या असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळ्या झाडून खून झालेला तरुण म्हणजे गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश कोमकर हा एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता.
काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे. मागील तीन पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिलंय. गेली पाच दशकं बाहेर खेळलं जात असलेलं टोळीयुद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरु झालं आणि सख्ख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली.त्यानंतर आता आंदेकर टोळीने सख्ख्या भाच्याचा खून केला आहे.
सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद
पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेल्या वनराज आंदेकरांच्या या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला. वनराज आंदेकर यांचं त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत बिनसलं होतं. या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी ,कल्याणी या दोन सख्ख्या बहिणी आणि जयंत आणि गणेश या त्यांच्या नवऱ्यांसह सोमनाथ गायकवाड , या प्रमुख आरोपींसह 23 जणांना अटक केली होती.
कोण आहे वनराज आंदेकर?
वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या. 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.