काळ्या काचांमुळे अडवली गाडी
याबाबत वाहतूक विभाग प्रमुख पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे यांनी माहिती दिली. वारजे उड्डाणपुलाजवळ कात्रजकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर वाहतूक कर्मचारी दत्ता मरगळे आणि राहुल कदम हे आपली ड्युटी करत होते. यावेळी एका मारुती 800 गाडीच्या (एमएच 12 बीजी 8867) सर्व काचांना ब्लॅक फिल्म लावलेली असल्यानं पोलिसांनी ती गाडी बाजूला घेण्यास सांगितलं.
advertisement
गाडी बाजूला न घेता, गाडीतील रेहान रशीद शेख आणि बाबा रफीक शेख (दोघेही, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) या तरुणांनी पोलिसांना अरेरावी सुरू केली. 'गाडी बाजूला घ्यायला कशाला सांगतोस?' असं विचारून त्यांनी पोलिसांवर ओरडण्याचा आणि हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर त्यांनी ब्लॅक फिल्म प्रकरणी असलेला नियमित वाहतूक दंड भरण्यासही नकार दिला.
माफी मागण्याचा व्हिडीओ व्हायरल
या प्रकारानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवल्यानंतर याच दोन तरुणांनी हात जोडून पोलिसांची माफी मागितल्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील कडक भूमिकेचे कौतुक होत आहे.
