पुणे - देशातील आदर्श आणि शालिन व्यक्तिमत्व, महान उद्योगपती, भारतीय उद्योगसमूहाचे एक प्रेमळ आणि सोज्वळ, असे रुप म्हणजेच रतन टाटा. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग विश्वाबरोबरच देशाच्या सामाजिक जाणीवेतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनांनंतर त्यांच्याविषयी पुणेकर नागरिकाने रतन टाटा यांच्या सोबतची एक आठवण लोकल18 शी बोलताना सांगितली.
advertisement
टाटा यांच्या कंपनीतील एक जुना कर्मचारी आजारी आहे, असे कळल्यावर रतन टाटा स्वतः मुंबईहून त्यांना भेटायला पुण्यात आले होते. 3 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील कोथरूडमधील गांधी भवनशेजारील वूडलँड सोसायटीत राहणाऱ्या या कर्मचाऱ्याची भेट घ्यायला रतन टाटा हे त्या सोसायटीत गेले. त्यावेळी त्याच सोसायटीत राहणारे अभिजित मकाशीर आणि त्यांची मुलगी अदिश्री यांची अगदी योगायोगाने टाटा यांच्याशी भेट झाली होती. रतन टाटा हे त्या सोसायटीतली लिफ्ट खाली येण्याची वाट पाहत होते. यावेळी अभिजित आणि त्यांच्या मुलीशी टाटा यांनी काही वेळ छान गप्पा मारल्या.
यावेळी बोलतांना अभिजित मकाशीर यांनी सांगितले की, आम्ही इंग्रजीत बोलायची जुळवाजुळव करत होतो. तेव्हा रतन टाटांनीच आमच्याशी मराठी-हिंदीत संवाद साधायला सुरुवात केली. आम्ही पुन्हा थक्क झालो. निघताना त्यांनी माझ्या मुलीला जे सांगितले, ते पक्के मनावर कोरले गेले. ते म्हणाले होते, 'सेट युवर गोल अँड फोकस ऑन इट'. माझ्या मुलीसाठी तो कानमंत्रच बनून गेला.
इतका मोठा माणूस मात्र, त्यांचा इतका साधेपणा मनाला भावणारा होता. सामान्य माणसाशीही ते अगदी अदबीने बोलत होते, ते पाहून मी आणि माझी मुलगी भारावून गेलो तसेच टाटा यांचा पेहराव देखील अत्यंत साधा होता. हातात पिशवी आणि त्यांचे काही औषधे असल्याची आठवणही त्यांनी सांगितली.