पुणे - प्रसिद्ध उद्योगपती, उद्योग जगतातील अनमोल रत्न, रतन टाटा यांचे काल बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. पण त्यांच्या या निधनानंतर टाटा उद्योग समुहातील कंपन्यांतील कामगारांनी भावना व्यक्त करत काम आजही सुरू ठेवण्यामागचे कारण सांगितले.
रतन टाटांनी काय संदेश दिला होता -
advertisement
पिंपरी चिंचवड शहरात औद्योगिक क्रांती घडवण्यामागे टाटा मोटर्स कंपनीचे मोठं योगदान आहे. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या पुण्यातील टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये टाटांचे निधन झाल्यानंतरही काम बंद ठेवण्यात आलेले नाही. मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचे, कामगारांचे नुकसान व्हायला नको, असे स्वतः रतन टाटा यांनी कामगारांनी सांगितले होते. रतन टाटा यांच्या याच आज्ञेचे पालन करत आज टाटा उद्योग समुहाच्या पुण्यातील कंपनीचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.
पुण्यातील भोसरी येथील प्लांट रतन टाटा यांच्या प्रचंड आवडीचा होता. त्याचा 2012 सालचा वाढदिवस त्यांनी याच प्लांटमध्ये साजरा केला होता. तसेच याच भोसरी येथील प्लांटमध्ये त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. या दिवसाचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. टाटा मोटर्सचे अनेक प्लांट आहेत. मात्र, पुण्याच्या ठिकाणाची एक वेगळी ओळख होती.
टाटा जेव्हा इथे यायचे, तेव्हा ते पहिल्यांदा आपली इच्छा व्यक्त करायचे. ते युनियनचा खूप आदर करत होते. त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा इथेच केली, आम्ही त्यांचा वारसा सुरू ठेवू इच्छितो. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी कोविडच्या काळात जे केले ते आम्ही कधीही विसरू शकत नाही, अशा भावना कामगारांनी लोकल18 शी बोलताना व्यक्त केल्या.