नेमकी घटना काय?
सोनेसांगवी परिसरात मोलमजुरी करणारे सोमनाथ काळे आणि त्यांचे कुटुंब झोपडीत राहतात. मृत मेघना ईश्वर काळे ही मुलगी दिव्यांग असल्याने हालचालींसाठी इतरांवर अवलंबून होती. ती मुख्य झोपडीच्या मागील बाजूस असलेल्या एका छोट्या पालात एकटीच झोपली होती. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास जेव्हा तिचे कुटुंबीय उठले, तेव्हा त्यांना झोपडीची पडझड झाल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले असता मेघना रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली.
advertisement
हिंस्र प्राण्याने मेघनाच्या गळ्याचे गंभीर लचके तोडले होते, तर तिच्या मांडीचा बराचसा भाग खाल्लेला होता. ती दिव्यांग असल्याने तिला प्राण्याचा प्रतिकार करता आला नसावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अविनाश विसलकर यांनी मृतदेहावरील जखमांजवळील स्वॅब गोळा केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा बिबट्याचा हल्ला किंवा सर्पदंश असल्याचे स्पष्ट होत नाही. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच हा हल्ला कोणत्या प्राण्याने केला, हे निश्चित होईल. मात्र, या घटनेमुळे शिरूर परिसरात वन्यप्राण्यांच्या आणि भटक्या कुत्र्यांच्या वावराबाबत ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
