सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
काल कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणालं की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
advertisement
गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या
योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. सबब योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट पोस्टवर टॅग करून राजीनाम्याची मागणी केली आहे.
योगेश कदम काय म्हणाले होते?
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असं योगेश कदम म्हणाले होते.