नेमके घडले तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 25 ते 26 ऑक्टोबरदरम्यान करांडे कुटुंब तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्यांनी घरात मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेतली होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत काही सराईत चोरांनी या भागातील बंद घरांची रेकी करून करांडे यांच्या घरावर डल्ला मारला. त्यांनी कपाट फोडून आत ठेवलेले दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केला.
advertisement
देवदर्शनावरून परतल्यावर घरातील दरवाजे आणि कपाट अस्ताव्यस्त पाहून करांडे कुटुंबीयांचा धक्का बसला. सर्व दागिने आणि रोकड गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून घटनास्थळाचा पंचनामा केला. चोरांच्या फिंगरप्रिंटचे नमुने घेतले गेले आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात झाली.
सात दिवसांतच पोलिसांना यश
तळेगाव, वडगाव, कामशेत आणि मावळ परिसरातील अनेक ठिकाणचे फूटेज पाहिल्यानंतर पोलिसांना दोन संशयितांवर संशय आला. त्यांचा माग काढत पोलिसांनी पुण्यापर्यंत तपास वाढवला. तब्बल सात दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना यश मिळाले. खराडी परिसरातून साहील निसार शेख आणि सद्दाम गुलाब बागवान या दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली आणि चोरी केलेले दागिने कुठे लपवले होते तेही सांगितले.
तळेगाव पोलिसांनी त्यांच्या कडून सुमारे 8 लाख रुपये किमतीचे 24तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि त्यांच्या तपास पथकाचे अभिनंदन केले.
या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता, सातत्याने केलेला तांत्रिक तपास आणि सात दिवसांचा अथक परिश्रम यामुळेच चोरीचा गुन्हा उघडकीस आला आणि सर्व मुद्देमाल परत मिळाला. करांडे कुटुंबीयांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले असून, “देवदर्शनावर गेलो आणि देवच पावला,” असं म्हणत त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.
