या प्रदर्शनात स्नायपर एमके-१, एअर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल, एके-४७ रायफल, एमएमजी गन, टियर गॅस गन यांसह विविध प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे मांडण्यात आली आहेत. याशिवाय ड्रोन, आर्टिलरी अम्युनिशन, एरियल बॉम्ब, ग्रेनेड, रॉकेटचे विविध प्रकार, मल्टी बॅरेल लॉन्च सिस्टिम, बुलेट्स, हँड ग्रेनेड तसेच अँटी सबमरीन रॉकेट यांची मॉडेल्स देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भारतीय पायदळ, नौदल आणि हवाई दलासाठी वापरली जाणारी ही शस्त्रास्त्रे आणि युद्धसज्जतेची साधने पाहण्याची दुर्मीळ संधी पुणेकरांना मिळत आहे.
advertisement
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील म्युनिशन्स इंडिया लिमिटेडने पुण्यात विकसित केलेली आणि भारतासह विविध देशांमध्ये निर्यात केली जाणारी स्वदेशी शस्त्रास्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे हे प्रदर्शन देशाच्या संरक्षण क्षेत्रातील प्रगती अधोरेखित करते. कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, या प्रदर्शनाच्या नियोजनात प्रत्यक्ष सैन्यदलातील जवान सहभागी झाले असून प्रत्येक शस्त्राविषयी सविस्तर माहिती नागरिकांना तात्काळ दिली जात आहे.
त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचे ठरत आहे. संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान, स्वदेशी उत्पादन क्षमता आणि भारताची वाढती सामरिक ताकद यांची ओळख नागरिकांना होत आहे. हे प्रदर्शन 26 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत खुले राहणार असून प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनांचा अभिमानास्पद अनुभव घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.