का घेतला जातोय हा निर्णय?
हिर्डोशी ते वरंधा घाट या दरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद असून तिथे मोठी आणि धोकादायक वळणे आहेत. सध्या या मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता रुंद होता तिथे 'डीएलसी'चे काम पूर्ण झाले आहे. मात्र, हिर्डोशीच्या पुढे एका बाजूला देवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने रस्ता वाढवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. काम सुरू असताना इथून वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे ठरू शकते, असे महामार्ग विभागाचे म्हणणे आहे.
advertisement
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान
पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाट भागातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्याचे नियोजन कंत्राटदाराने केले आहे. वन विभागाच्या हद्दीतील कामांसाठीही प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत. हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी मार्ग बंद ठेवणे अनिवार्य असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासकीय हालचाली सुरू
भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांना महामार्ग विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. यानुसार त्यांनी तहसील आणि भोर पोलीस विभागाला यावर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अहवालानंतर जिल्हा प्रशासन अंतिम निर्णय घेणार आहे. जर हा घाट बंद झाला, तर प्रवाशांना पर्यायी मार्गाचा (ताम्हिणी किंवा पोलादपूर) वापर करावा लागेल, ज्यामुळे प्रवाशांच्या नजरा आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
