APMC Market: ऊन तापलं, मार्केट हाललं, लिंबू, केळीच्या आवकेत घट; द्राक्षे, कांद्याला कुठं मिळाला भाव?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
APMC Market: महाराष्ट्रातील कृषी मार्केटमध्ये रविवारी मोठ्या घडामोडी राहिल्या. कांदा, लिंबू, द्राक्षे आणि केळींच्या दरांबाबत जाणून घेऊ.
सांगली: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका कृषी मार्केटला देखील बसत आहे. त्यातच राज्यावर अवकाळी संकट घोंघावत असल्याने शेतीला मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्राच्या शेती बाजारात रविवारी, 22 मार्च रोजी कमी-अधिक प्रमाणात शेती मालाची आवक झाली. यातील कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबाची आवक आणि त्याच्या दरांबाबत जाणून घेऊ.
कांद्याची आवक वाढली
राज्याच्या मार्केटमध्ये आज 33 हजार 702 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. कालच्या तुलनेत आवकेत पंधरा हजार क्विंटलची सुधारणा झाली. यापैकी 16 हजार 549 क्विंटल सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 200 ते 1113 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 हजार 874 क्विंटल कांद्यास मिळालेला 1100 रुपये सर्वसाधारण भाव आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
advertisement
लिंबाची आवक दबावात
वाढत्या उन्हासह बाजारातील लिंबाची मागणी देखील वाढते आहे. मात्र लिंबाची आवक दबावातच आहे. राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 97 क्विंटल लिंबाची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 44 क्विंटल लिंबास 8000 ते 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लिंबास 11000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्षाचे दर
द्राक्ष हंगामावर झालेला युद्धस्थितीचा परिणाम तसेच अवकाळी पावसाचा परिणाम पाहता राज्याच्या कृषीमार्केटमध्ये द्राक्षाची आवक वाढेल असा द्राक्ष बाजारातील जाणकारांचा अंदाज आहे. मात्र आजवर बाजारात द्राक्षाची आवक दबावातच दिसते. राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 195 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 140 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 7000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक झालेल्या 52 क्विंटल द्राक्षास 16000 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक कमी
राज्याच्या मार्केटमध्ये केळीला चांगला उठाव मिळतोय. मात्र सरासरीच्या तुलनेत केळीची आवक कमीच आहे. आज केवळ 272 क्विंटल केळीची आवक झाली. पुणे बाजारात आवक झालेल्या केळीस प्रतीनुसार 1500 ते 1800 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला. अवकाळी पावसाचा आणि युद्धाचा केळी पिकास फटका बसल्याचे उत्पादक सांगत आहेत.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 9:41 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: ऊन तापलं, मार्केट हाललं, लिंबू, केळीच्या आवकेत घट; द्राक्षे, कांद्याला कुठं मिळाला भाव?








