Ashok Kharat: 'कॅप्टन' खरात प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांचे ते फोटो अन् 5 कोटींची खंडणी, पुण्याचा 'राजेंद्र जासूद' एसआयटीच्या रडारवर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मुंबईच्या दिनेश परब याने खरातशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला होता. "पुण्यातील राजेंद्र जासूद याच्याकडे तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो आहेत," असे सांगून समाजात बदनामी करण्याची धमकी देण्यात आली
पुणे : नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्याभोवती अटकेचा पाश घट्ट होत असतानाच, आता या प्रकरणातील पुणे कनेक्शन समोर आले आहे. खरातला ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी पुण्यातील संशयित राजेंद्र अशोक जासूद याची आता विशेष तपास पथकामार्फत (SIT) सखोल चौकशी केली जाणार आहे.
पुण्याच्या जासूदकडे होते 'आक्षेपार्ह' फोटो?
वावी पोलीस ठाण्यात (नाशिक ग्रामीण) खरातने दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबईच्या दिनेश परब याने खरातशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला होता. "पुण्यातील राजेंद्र जासूद याच्याकडे तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो आहेत," असे सांगून समाजात बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. हे प्रकरण 'सेटल' करण्यासाठी संशयितांनी खरातकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली होती.
advertisement
एसआयटीची पुण्यात तपासाची चक्रे
आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील 'एसआयटी'ने आता या खंडणी प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. पुण्यातील राजेंद्र जासूद याच्याकडे खरोखरच ते फोटो होते का? आणि असल्यास ते त्याच्याकडे कोठून आले? याचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांची सात तास 'इन कॅमेरा' चौकशी करण्यात आली. खरातच्या बंगल्यातून आणि कार्यालयातून जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि हार्डडिस्कमध्ये जासूद किंवा परब यांच्याशी संबंधित काही पुरावे मिळतात का, यावर पोलिसांचा भर आहे.
advertisement
आणखी ३ महिलांच्या तक्रारी
एकीकडे खरातवर आणखी तीन महिलांनी शोषणाचे आरोप केले असतानाच, दुसरीकडे खरातला ब्लॅकमेल करणाऱ्या जासूद आणि परब यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणाला गुंतागुंतीचे वळण मिळाले आहे. पुण्याचा राजेंद्र जासूद हा खरातच्या संपर्कात कसा आला आणि या मोठ्या खंडणी नाट्यात त्याचे नेमके काय हितसंबंध होते, याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 10:15 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ashok Kharat: 'कॅप्टन' खरात प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांचे ते फोटो अन् 5 कोटींची खंडणी, पुण्याचा 'राजेंद्र जासूद' एसआयटीच्या रडारवर








