YouTube वर पाहिलं अन्..., वॉर्डबॉयचं भयंकर कांड, संभाजीनगरच्या 'त्या' प्रकरणात मोठी कारवाई
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश सोनवणे तसेच महालॅबमध्ये काम करणाऱ्या महिलेचा पती सपकाळ हे अद्याप फरार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : नारेगाव परिसरात समोर आलेल्या अवैध गर्भपात आणि लिंगनिदान प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे याच्या दोन निकटवर्तीयांना शनिवारी (29 मार्च) पिसादेवी भागात सापळा रचून अटक केली. राहुल माणिकराव झोंड (वय 28, मयूर पार्क) आणि सोमनाथ परसराम वारसे (वय 31, कमळापूर, वाळूज) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे राहुल हा फक्त बारावीपर्यंत शिक्षित असून त्याने यूट्यूबच्या माध्यमातून लिंगनिदान करण्याची पद्धत शिकल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण रॅकेटमधील सदस्य व्हॉट्सअॅप कॉलद्वारे एकमेकांशी संपर्कात होते.
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव आणि सहायक निरीक्षक कैलास लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला बनावट रुग्ण म्हणून आरोपींशी संपर्क साधण्यास सांगितले. गर्भपातासाठी तपासणी हवी असल्याचे सांगितल्यावर आरोपींनी 14 हजार रुपये आकारले जातील असे सांगितले.
advertisement
पोलिसांनी याला होकार दिल्यानंतर आरोपी पिसादेवी येथे आले आणि आधीच दबा धरून बसलेल्या पथकाने कारमधून उतरताच त्यांना पकडले. या कारवाईदरम्यान विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी ‘प्रोब’, एक टॅब आणि कार जप्त करण्यात आली. ही कारवाई गणेश डोईफोडे आणि देविदास काळे यांच्या पथकाने यशस्वी केली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश सोनवणे तसेच महालॅबमध्ये काम करणाऱ्या महिलेचा पती सपकाळ हे अद्याप फरार आहेत. या साखळीतील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या सपकाळसह सोनवणे हे दोघे मिळून हे संपूर्ण रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून त्यांच्या अटकेनंतर शहरातील अनेक मोठ्या रुग्णालये आणि लॅबमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
या प्रकरणातील आरोपी राहुल झोंड आणि सोमनाथ वारसे हे डॉ. सोनवणेच्या टोळीतील सक्रिय सदस्य होते. सोनवणे याला अटक झाल्यानंतर त्याला हर्सूल कारागृहात पाठवण्यात आले. त्या काळातच या दोघांनी त्याच्याकडे असलेला सोनोग्राफी ‘प्रोब’ स्वतःकडे घेतला आणि पुढील काम सुरू ठेवले.
राहुल झोंड याने शहरातील एका नामांकित रुग्णालयात वॉर्डबॉय आणि ओटी असिस्टंट म्हणून काम केल्यामुळे त्याला वैद्यकीय क्षेत्राची प्राथमिक माहिती होती. उर्वरित कौशल्य त्याने यूट्यूबवरून आत्मसात केले. तर सोमनाथ वारसे हा दहावीपर्यंत शिक्षित असून तो पूर्वी डॉ. सोनवणेचा चालक होता. त्याला टॅब हाताळणे आणि लोकेशन शोधण्यात प्रावीण्य आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 10:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
YouTube वर पाहिलं अन्..., वॉर्डबॉयचं भयंकर कांड, संभाजीनगरच्या 'त्या' प्रकरणात मोठी कारवाई







