1) शुक्रवार पेठ : शुक्रवार पेठ ही पुण्यातील एक जुनी आणि प्रसिद्ध बाजारपेठ आहे. येथे असलेल्या होलसेल दुकानांमध्ये सजावटीच्या वस्तूंची मोठी रेलचेल आहे. फुलांच्या माळा, आर्टिफिशिअल फुले, रंगीबेरंगी तोरणे, ग्रीन जाळी अशा वस्तू अगदी परवडणाऱ्या दरात मिळतात. काही दुकानांमध्ये फुलांच्या माळा फक्त 50 रुपयांत पाच, तर 120 ते 450 रुपयांत दहा माळा मिळतात. गणेशोत्सवाच्या दिवसांत ही पेठ भक्तांनी गजबजलेली दिसते.
advertisement
2) रविवार पेठ : पुण्यातील रविवार पेठेतही गणपती सजावटीसाठी लागणारे साहित्य सहज मिळते. येथे दर्ज्याच्या समोरच्या गल्लीत अनेक स्टॉल्स आणि दुकाने सजलेली असतात. रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांपासून ते स्थिर दुकानांपर्यंत सर्वत्र सजावटीच्या वस्तू मिळतात. फुले, माळा, आर्टिफिशिअल फोम शीट, फुलांचे लाकडी स्टँड, अशा विविध वस्तू स्वस्त दरात विकल्या जातात. दरवर्षी काही नवीन सजावटीच्या वस्तू येथे आणल्या जातात, त्यामुळे भक्तांना सजावटीसाठी वेगळेपणा आणता येतो.
3) लक्ष्मीनारायण मार्केट : लक्ष्मीनारायण मार्केट हे होलसेल खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशिअल फुले, वेली, सजावटीचे स्टँड व फुलांनी सजवलेल्या फोम शीट्स मिळतात. विशेष म्हणजे येथे वस्तू डझनभर मिळतात. 20 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या फुलांच्या माळा येथे सहज खरेदी करता येतात. गणेशोत्सवाच्या दिवसांत या मार्केटमध्ये खरेदीदारांची मोठी गर्दी असते.
4) बोहरी आळी मार्केट : कसबा पेठजवळील बोहरी आळी मार्केटदेखील गणपती सजावटीसाठी खास ठिकाण मानले जाते. विविध रंग आणि आकारातील आर्टिफिशिअल फुले, वेली, गुच्छ, फ्लॉवर पॉट्स येथे उपलब्ध आहेत. खास आकर्षण म्हणजे गणपतीसाठी वेलवेटच्या आसनांची विविध व्हरायटी येथे मिळते. भक्त आपल्या बाप्पाच्या मूर्तीला खास आसन देण्यासाठी या मार्केटला जरूर भेट देतात.