उपवासाच्या नियमांबाबत असलेला हा संभ्रम आणि बदलत्या जीवनशैलीत उपवासाच्या नावाखाली आपण जे 'फराळी' पदार्थ खातो, ते आरोग्यासाठी कितपत योग्य आहेत? यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.
पारणं कधी करावं?
शास्त्रानुसार, महाशिवरात्रीचा उपवास हा इतर उपवासांपेक्षा थोडा वेगळा मानला जातो. अनेक जण रात्री फराळ करून उपवास सोडतात, पण धार्मिक ग्रंथांनुसार याला विशेष नियम आहेत.
advertisement
दुसऱ्या दिवशी पारणं:
महाशिवरात्रीचा खरा उपवास हा चतुर्दशी तिथी असेपर्यंत पाळला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून, शिवपूजा करून मगच अन्नाचा घास घेणं (पारणं करणं) अत्यंत शुभ मानलं जातं.
रात्रीचा फराळ:
जे भाविक पूर्ण वेळ निर्जळी किंवा कडक उपवास करू शकत नाहीत, ते रात्री शिवपूजेनंतर दूध, फळं किंवा सात्विक फराळ घेऊ शकतात. मात्र, पूर्ण जेवण दुसऱ्या दिवशी सकाळी घेणं शास्त्रोक्त मानलं जातं.
महाशिवरात्रीच्या उपवासाचं महत्त्व
हा केवळ खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्याचा दिवस नाही, तर ती एक 'साधना' आहे. शिवरात्रीला उपवास केल्याने इंद्रियांवर ताबा मिळवता येतो आणि मनाची एकाग्रता वाढते, असं मानलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर, ऋतू बदलाच्या या काळात उपवास केल्याने शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडण्यास मदत होते.
उपवासाला 'हे' नक्की खा (Dos)
महाशिवरात्रीचा उपवास करताना शरीर हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे.
फळं: केळी, सफरचंद, संत्री यांसारखी हंगामी फळं खावीत, ज्यामुळे ऊर्जा टिकून राहते.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: थंड दूध, ताक किंवा दही घेतल्याने पोटातील जळजळ कमी होते.
सुका मेवा: बदाम, अक्रोड आणि खजूर खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते.
राजगिरा: पचायला हलका आणि पौष्टिक असल्याने राजगिऱ्याचा शिरा किंवा लाडू उत्तम पर्याय आहे.
इतर उपवासांच्या तुलनेत 'या' गोष्टी टाळा (Don'ts)
बऱ्याचदा आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याचे वेफर्स मोठ्या प्रमाणात खातो. पण महाशिवरात्रीला काही गोष्टी टाळणं हिताचं ठरतं:
साबुदाणा पचायला जड असतो आणि त्याने पित्त वाढू शकतं. महाशिवरात्रीला शक्यतो फळांवर भर द्यावा.
उपवासाचे पापड किंवा भजी खाल्ल्याने आळस येतो आणि उपासनेमध्ये अडथळा निर्माण होतो.
अनेक जण या दिवशी 'अळणी' (मिठाशिवाय) उपवास करतात. जर मीठ वापरायचं असेल तर साध्या मिठाऐवजी 'सैंधव मिठाचा' वापर करा.
वारंवार चहा किंवा कॉफी घेणं टाळा, कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं.
महाशिवरात्रीचा उपवास हा श्रद्धेचा भाग आहे. जर तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील किंवा औषधोपचार सुरू असतील, तर कडक उपवास करण्यापेक्षा आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या. महादेवाला तुमच्या श्रद्धेची भूक आहे, उपासाची नाही.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
