ठाणे: सुमारे 1100 वर्षांचा इतिहास असलेले ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यभरातून लोक इथं दर्शनासाठी येत असतात. साधारण 1760 मध्ये म्हणजेच 18 व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराबद्दल आख्यायिका अनेक आहेत. त्यापैकी तीळातीळाने येथील शंकराची पिंड मोठी होते, अशी आख्यायिका भक्तांकडून सांगितले जाते. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
भारताच्या कानाकोपऱ्यात विविध देवी-देवतांची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा स्वतःचा इतिहास असतो. ठाणे शहरात असेच एक मंदिर आहे. या मंदिराचे नाव कौपिनेश्वर मंदिर आहे. कौपिनेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकरांचे मंदिर नसून, पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या आवारात अन्य देवतांची लहान मंदिरे देखील आहेत. त्यामुळे दत्तजयंती, हनुमान जयंती, नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्र असे उत्सव मंदिरात नियमित साजरे केले जातात.
Mahashivratri 2025: शिवलिंगावर कोणती फुलं वाहावी? पाहा महाशिवरात्री मुहूर्त, व्रत आणि विधी
शिवलिंगाची वाढतेय उंची
राज्यभरात असलेल्या सर्वच मंदिरांमधल्या शिवलिंगांपैकी या मंदिरात असलेल शिवलिंग हे सर्वात मोठे आहे. शिवलिंगाचा व्यास पाच फूट आणि उंची पाच फूट आहे. असे मानले जाते की दरवर्षी शिवलिंगाची उंची वाढते आणि ज्या दिवशी ते मंदिराच्या छताला स्पर्श करेल त्या दिवशी विनाश होईल. देशभरात किंवा देशाच्या बाहेर यापेक्षा मोठे शिवलिंग असू शकते मात्र, महाराष्ट्रात असलेल्या सर्व मंदिरांमध्ये या आकाराचे शिवलिंग कुठेही पाहायला मिळत नाही, असं सांगितलं जातं.
मंदिरातील जुन्या लाल छताच्या फरशा आणि लाकडी रचना खरोखरच भाविकांचे लक्ष वेधून घेतात. हे मंदिर वर्दळीच्या ठाणे स्टेशन रोडवर आहे, तरीही मंदिर परिसर भाविकांना शांत आणि प्रसन्न वातावरण देते. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी दूरदूरहून भाविक येतात.
मंदिराचा इतिहास
कौपिनेश्वर मंदिर हे ठाणे येथील कुलदैवत मानल्या जाणाऱ्या भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक मोठा नंदी भक्तांचे स्वागत करतो. इसवी सन 1240 या काळात ठाणे प्रदेशावर शिलहारा राजवंशाचे राज्य होते. ते भगवान शिवाचे कट्टर अनुयायी होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या राजवटीत कौपिनेश्वर मंदिर बांधले. मूळतः कौपिनेश्वर मंदिर भगवान कोपिनेश्वर यांच्या सन्मानार्थ पाण्याखाली बांधले गेले होते. 1760 मध्ये, सरसुभेदार रामाजी महादेव बिवलकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1879 मध्ये, हिंदू समुदायाने मंदिर पुन्हा बांधले. तेव्हापासून, मंदिर परिसरात विकास कामे झाली आहेत. गर्भगृहासमोरील सभामंडप 1879 मध्ये देणग्या गोळा करून पुनर्संचयित करण्यात आला. नंतर 1996 मध्ये त्याचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले.
मंदिर परिसर पहिल्यापासूनच मोठा आहे. त्यामुळे मंदिरांची जागा सोडून अन्य आवार अतिशय मोठे आहे. शहराच्या मध्यवस्तीत असूनही येथील वातावरणावर गर्दीचा परिणाम होत नाही. मुंबई ठाण्यात असूनही तुम्ही अजूनही या कौपिनेश्वर मंदिराला भेट दिली नसेल, तर आवर्जून या महाशिवरात्रीला या प्रसिद्ध मंदिराला भेट द्या. ठाणे स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावरच हे मंदिर आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)